- पिकामध्ये प्रत सुधारण्याच्या दृष्टीने पालाश महत्त्वाचे आहे. फळांचा आकार वाढविणे, रंग आकर्षक करणे, टिकवणक्षमता वाढविण्यासाठी पालाश हा घटक महत्त्वाचा आहे. तृणधान्य पिकांच्या प्रतीमध्ये सुधारणा होते. कडधान्य पिकात मुळांवरील गाठींची संख्या आणि वजनवाढीस उत्तेजन देते, जैविक नत्र स्थिरीकरणास मदत होते.
- तेलबिया पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. नत्राचा योग्य प्रमाणात वापर होऊन प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. बियांचे वजन व आकारमान वाढते.
- पालाशची संतुलित मात्रा वापरल्यामुळे फळपिकांमध्ये फळे तडकणे, फळे निस्तेज होऊन कोमेजणे यांसारख्या विकृती कमी करता येतात. फळांना त्यांचा आकार, घट्टपणा, वजन, चकाकी, गोडपणा, जीवनसत्त्वे, तसेच रसाचे प्रमाण इत्यादीमध्ये पालाशच्या पोषणाचा फायदा होतो.
- गव्हामध्ये पालाशचा फायदा प्रत सुधारण्यामध्ये होऊन प्रथिनांचे प्रमाण वाढते. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते.
पालाशच्या कमतरतेची लक्षणे
- जमिनीत पालाशची कमतरता असल्यास पाने कडांकडून जांभळी आणि लालसर तपकिरी होऊ लागतात आणि हळूहळू हा रंग पानांच्या कडांकडून मध्यभागाकडे पसरतो, हळूहळू ही पाने खाली मुडपतात.
- पानांच्या शिरांमध्ये पिवळेपणा वाढताना दिसून येतो. पालाशची कमतरता सर्वप्रथम जुन्या पानांवर दिसून येते. पिकांची वाढ खुंटते, उत्पादनात घट येते.
- मुळांची व खोडाची वाढ चांगली होत नाही. पीक उत्पादनाचा दर्जा खालावतो.
- कीड, रोगराई, दुष्काळ, धुके यांच्याविरुद्धची प्रतिकारशक्ती कमी होते.
- कपाशीची पाने तपकिरी, जांभळ्या रंगाची होऊन गळून पडतात. सोयाबीनची पाने पिवळसर होऊन सुकतात. भाजीपाला व फळे यांची टिकवण्याची क्षमता कमी होते. गळिताच्या पिकात तेलाच्या प्रमाणात घट होते.
- खोड बारीक राहून मुळांची वाढ नीट होत नाही. धान्याची प्रत बिघडून सुरकुत्या पडतात.
पालाशयुक्त खतांचा वापर
सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, कोंबडी खत इत्यादींसारख्या भरखतांमध्ये पालाशचे प्रमाण चांगले असते.
पालाशची हळूहळू पिकांना उपलब्धता होते. या जोरखतांचा वापर न केल्यामुळे व सतत पिके घेतल्यामुळे जमिनीतील पालाशचा पुरवठा कमी होत जातो आणि पीक उत्पादनात घट येते.
रासायनिक खतांमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश ही पालाशयुक्त खते असतात.
शिफारशीनुसार पालाशयुक्त खतांचा संतुलित खत वापरामध्ये उपयोग केल्यामुळे नत्रयुक्त खतांचासुद्धा कार्यक्षम वापर होऊन, खतांच्या जास्तीच्या खर्चावरील अपव्यय टळून गरजेएवढीच खतांची मात्रा देणे शक्य होते.
नत्र व पालाशमधील परस्पर सकारात्मक संबंधामुळे उत्पादनात वाढ होऊन प्रत सुधारते, पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. नत्राची कार्यक्षमता वाढल्यामुळे, जास्तीत जास्त नत्राचे पिकावाटे शोषण होत असल्यामुळे जमिनीत उरणाऱ्या नायट्रेटची मात्रा कमी होऊन प्रदूषणाचा धोका टळतो.
खत व्यवस्थापनात पालाशचा उपयोग केल्यामुळे नत्राचा कार्यक्षम वापर होतो. नत्र स्थिरीकरणामध्ये वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते.
सेंद्रिय खताच्या स्वरूपात, तसेच पिकांच्या अवशेषांचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रमाणात पालाश मिळतो आणि त्याचबरोबर जमिनीचे भौतिक गुणधर्मही सुधारण्यास मदत होऊन जमिनीचे आरोग्य चांगले टिकविण्यास मदत होते.
0 comments:
Post a Comment